महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – नागपूर –सोने, चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. रुपया मजबूत झाल्याने मंगळवारी बाजारात सोने आणि चांदीचे भाव कोसळले. शहरात प्रती तोळा सोने १००० रुपयांनी तर चांदी प्रति किलो १००० रुपयांची घट झाली. त्यामुळे सोने खरेदीदारांना दिलासा मिळाला असताना चांदी शौकिनांची चांदी होणार आहे.मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती घटल्या. शहरात सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा ४६,८०० रुपयांवरून ४५,८०० रुपये झाला. सोमवारी सोन्याच्या भावात प्रतितोळा २०० रुपयांची घट झाली होती.
गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भावात सतत चढ उतार सुरू आहे. सोन्याच्या किमतीबरोबर चांदीच्या किमतीत मोठी घट झाली. चांदी प्रतिकिलो ६९,५०० वरून थेट ६८,५०० रुपयांवर आली आहे.
अमेरिकन सरकारी रोख्यांमधील परतावा वाढल्याने (यूएस ट्रेझरी यिल्ड) सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याचा भाव घसरला आहे. अमेरिकन बाजारात शुक्रवारी स्पॉट गोल्डचा भाव प्रती औंस १७७०.१५ डॉलर आहे. त्यात आठवडाभरात ०.६ टक्के घसरण झाली आहे. अमेरिकेत महागाईचा पारा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोख्यांवरील परतावा वाढला. तसेच डॉलरचे मूल्य वधारले. ज्यामुळे सोन्यावरील दबाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सोने-चांदीच्या भावात घसरण झालेली आहे.