Pune Temperature : उकाड्याची चाहूल! पुण्यात किमान तापमानात झपाट्याने वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १९ फेब्रुवारी २०२६ || Pune – फेब्रुवारी संपत आलेला असताना गारव्याची अपेक्षा करणाऱ्या पुणेकरांना उकाड्याचीच चाहूल लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमानात लक्षणीय वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी किमान तापमानात तब्बल चार अंश सेल्सिअसने वाढ झाली, तर बुधवारी (ता. १८) ही वाढ कायम राहिली. परिणामी सकाळी जाणवणारा गारवा कमी झाला असून, दिवस चढताच उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. दुपारी रस्त्यांवर उन्हाचा चटका आणि सायंकाळी उबदार वातावरण अशी स्थिती शहरात पाहायला मिळत आहे.

India Meteorological Departmentने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस हवामानात फारसा बदल अपेक्षित नाही. मंगळवारी (ता. १७) किमान तापमानात सुमारे चार अंश, तर कमाल तापमानात एक अंश सेल्सिअसची वाढ झाली. बुधवारी किमान तापमान १७.१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. गुरुवारी (ता. १९) कमाल तापमान ३३ अंश, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपासून (ता. २०) कमाल आणि किमान तापमानात आणखी किंचित वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, सोमवारपासून हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून, रात्री ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने जमिनीकडून उत्सर्जित होणारी उष्णता वातावरणातच अडकल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. तापमानातील ही तफावत सरासरीपेक्षा सुमारे दोन अंशांनी अधिक आहे. “रात्रीच्या तापमानात वाढ होऊन ऊबदारपणा जाणवू लागला आहे. या दिवसांमध्ये तापमानातील असे बदल नैसर्गिक आहेत,” असे डॉ. एस. डी. सानप, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे येथील वैज्ञानिक ‘डी’ यांनी सांगितले. पुढील काही दिवस उकाड्याची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *