महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.५ मार्च – भारतीय हवामानशास्त्र विभाग गेल्या काही वर्षांपासून पावसाप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याचेही ऋतुमान अंदाज वर्तवू लागला आहे. देशाच्या विविध भागांतल्या उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम अर्थव्यवस्था, शेती आणि दैनंदिन मानवी जीवनावरही होत असतो. त्यामुळे आपल्या भागात पुढच्या तीन महिन्यांत उन्हाची तीव्रता किती असणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आणि पुढे काय वाढून ठेवलं आहे याचं चित्र दर्शवणारे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) उन्हाळ्याविषयीचे अंदाजही जाहीर झाले. आयएमडीने उपविभागवार अंदाज वर्तवले आहेत. देशात एकूण ३६ उपविभाग असून त्यातले चार महाराष्ट्रात आहेत. कोकण (गोव्यासह), मध्य महाराष्ट्र (हा उत्तर दक्षिण असा उभा पट्टा), विदर्भ आणि मराठवाडा असे हे चार उपविभाग आहेत. त्यापैकी कोकण-गोवा पट्टय़ात यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, ओदिशा आणि छत्तीसगडमध्ये तापमान सरासरीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे. कोकण परिसरात दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी तापमान जास्तच राहण्याची चिन्हे आहेत. मध्य महाराष्ट्रातही रात्रीचा उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रावरून वाहून येणारं बाष्प मध्य महाराष्ट्रातही उकाडा वाढवेल, अशी चिन्हं आहेत. अर्थात हे सगळं त्या त्या वेळच्या वाऱ्यांवर अवलंबून आहे.
देशभराचा विचार करता, दक्षिण भारतात रात्रीचं तापमान एरवीपेक्षा काहीसं जास्त नोंदवलं जाण्याची शक्यता आहे. हवेतली आद्र्रता वाढणं आणि काही प्रमाणात पाऊस यामुळे ही स्थिती उद्भवते. उत्तर भारतातील उन्हाळा यंदा जास्त तीव्र असण्याचा अंदाज आहे. या मोसमात पंजाब, हरयाणा, चंदिगड, दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशात कमाल तापमान उन्हाळ्याच्या तीनही महिन्यांत सरासरीपेक्षा काहीसं अधिक असणार आहे. ते या काळात सामान्यपणे नोंदवल्या जाणाऱ्या तापमानापेक्षा ०.७१ टक्के अधिक असण्याची शक्यता आहे. या भागांत उष्ण दिवस- रात्रींची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, केरळ, तमिळनाडू, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालॅण्ड आणि अरुणाचल प्रदेशात रात्री अधिक उष्ण असतील.