महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.५ मार्च – देशातील अशी अनेक शहरं आहेत, जिथे कामानिमित्त बहुसंख्य लोकांनी स्थलांतर केलं आहे. त्यामुळे, दिवसरात्र गजबजलेली ही शहरं खरंच निवासाासाठी उत्तम (Best City to Live) आहेत का? हा प्रश्नही तितकाच महत्तवाचा आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयातर्फे दरवर्षी अशा शहरांची यादी तयार केली जाते. २०२० या वर्षासाठीचा ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स(Ease Of Living Index 2020) अर्थात निवासासाठी उत्तम असलेल्या शहरांचा निर्देशांक गुरुवारी जाहीर झाला. यात देशातील १११ शहरांची समावेश आहे. विशेष बाब म्हणजे यात राज्यातील ११ शहरांना हा बहुमान प्राप्त झाला आहे.
याबाबत पुण्यानं मुंबईलाही मागं टाकलं आहे. पुणेकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे १११ शहरांच्या या यादीत पुण्यानं (Pune)दुसरा क्रमांक पटकवला आहे. तर, पहिल्या क्रमांकावर बंगळुरू (Bengaluru) हे शहर आहे. पहिल्या १० शहरांच्या यादीत मुंबई (Mumbai)आणि नवी मुंबईचाही समावेश आहे. याशिवाय या यादीत नागपूर, नाशिक, वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड, सोलापूर या शहरांचाही समावेश आहे.
जगण्यासाठी अजिबात चांगले नसलेल्या शहरांचाही या यादीत उल्लेख करण्यात आलेला आहे. यात बरेली, धनबाद आणि श्रीनगरचा समावेश आहे.
देशात मोठय़ा शहरांमध्ये बंगळुरु आणि छोटय़ा शहरांमध्ये सिमला ही शहरे वास्तव्यासाठी सर्वात योग्य असल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने दिला आहे. १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वास्तव्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेले पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जीवनसुलभता आणि महापालिकांची कामगिरी दर्शवणारा यंदाचा निर्देशांक जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये पहिल्या ५० शहरांमध्ये महाराष्ट्रातील ११ शहरांचा समावेश आहे. जीवनसुलभतेच्या दृष्टीने त्या-त्या शहरांतील वास्तव्याची सुविधा, शिक्षण, आरोग्य, दैनंदिन व्यवस्था, अर्थव्यवस्था, सुरक्षितता आदी १३ निकष तपासण्यात आले. त्याआधारावर देशात वास्तव्यासाठी सर्वाधिक योग्य शहर कोणते हे ठरवण्यात आले.
महाराष्ट्रातील जीवनसुलभ शहरे व क्रमांक
१० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या – पुणे (२), नवी मुंबई (६), बृहन्मुंबई (१०), ठाणे (११), कल्याण-डोंबिवली (१२), पिंपरी-चिंचवड (१६), सोलापूर (१७), नागपूर (२५), औरंगाबाद (३४), नाशिक (३८) आणि वसई-विरार (३९)
१० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या- अमरावती (४५)
महाराष्ट्रातील महापालिका व क्रमांक. १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या- पिंपरी-चिंचवड (४), पुणे (५), बृहन्मुंबई (८), नवी मुंबई (११), ठाणे (२५), कल्याण-डोंबिवली (२६), नागपूर (३०), नाशिक (३२), वसई-विरार (४१), सोलापूर (४५) आणि औरंगाबाद (४७)
१० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या – अमरावती (२७)