सर्वसामान्यांचं जगणं झालं महाग ; गॅस, खाद्यतेल, डाळी, कडधान्य दरात वाढ

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंबरोबर खाद्यतेलाच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ झाली. पालेभाज्यांबरोबर आता कडधान्ये व डाळींचे दरही कडाडले आहेत. गॅस दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या गृहिणींचे या दरवाढीमुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

खाद्यतेलाच्या किमतीमध्ये दिवाळीपासून सुरू झालेल्या दरवाढीने मार्च महिन्यात उच्चांक गाठला आहे. सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या 15 किलोच्या डब्यासाठी तब्बल 200 ते 300 रुपये जादा मोजावे लागत आहेत. अनलॉकनंतर वाढलेले दर कमी होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत जीवनावश्यक वस्तूंबरोबरच खाद्यतेल, कडधान्य व डाळींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तूर डाळ व मूग डाळीचे दर कडाडल्याने सर्वसामान्यांची वरणभाताची गोडी कमी होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल पंचाहत्तर रुपये वाढ झाली. सध्या एका सिलिंडरसाठी 825 रुपये मोजावे लागतात. अनलॉकनंतर सर्व क्षेत्रांतील उद्योग व्यवसाय पूर्ववत सुरू झाले असले तरी अनेक कष्टकरी अजूनही उदरनिर्वाहासाठी दररोज संघर्ष करतोय. अशा कष्टकरी वर्गाचे वाढत्या महागाईमुळे जगणे महाग झाले आहे.

कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी बहुतांश नागरिक सोयाबीन किंवा सूर्यफुलाच्या तेलाला प्राधान्य देतात. त्यामुळे शेंगदाणा तेलाला मागणी कमी आहे. बहुतांश किराणा दुकानांमधून शेंगदाणा तेल हद्दपार झाले आहे. मागणी कमी असल्याने दोन महिन्यात शेंगतेलाच्या किमती स्थिर आहेत. सध्या शेंगदाणा तेलाची 165 रुपये किलो दराने किरकोळ विक्री होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *