‘ग्लोबल कोकण’ व ‘मायको’ ; कोकणातील हापूस आंब्याला विक्रमी भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – मुंबई – राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या पाच डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल १ लाख ८ हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी ‘ग्लोबल कोकण’ व ‘मायको’ या देशातील पहिल्याच डिजिटल व्यासपीठाद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत अवसरे यांना हा विक्रमी दर मिळाला आहे.

कोकणातील १० आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटींचा लिलावाचा कार्यक्रम अलिकडेच मुंबईत झाला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चार शेतकऱ्यांच्या मुहूर्ताच्या पेट्या प्रत्येकी २५ हजार रुपये दर देऊन विकत घेतल्या. अन्य मान्यवर राजेश अथायडे यांनी १ लाख ०८ हा सर्वाधिक दर दिला. लिलावात एकूण तीन लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ३१ हजार रुपये प्रमाणे ही रक्कम समप्रमाणात दिली जाणार आहे.

राजश्री यादवराव, सुप्रिया मराठे आणि सुनैना रावराणे या तीन महिला उद्योजकांनी एकत्र येत कोकणातील परिश्रमी १०० शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी पिकवलेल्या हापूसचा ब्रँड बाजारात आणण्यासाठी ‘मायको’ या व्यासपीठाची निर्मिती केली आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या पिकवलेला शेतातील अस्सल हापूस आंबा ग्राहकांना थेट घरपोच मिळणार आहे. प्रत्येक पेटीवर असणाऱ्या विशेष क्यूआर कोडद्वारे ग्राहकांना या आंब्याची लागवड कोणत्या शेतात आणि कधी करण्यात आली, शेतकऱ्याने कसे परिश्रम घेतले, त्याची बाग याची संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *