महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २३ – पुणे – पुणे, मुंबई आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये वाढणारी कोरोना रुग्णसंख्या चिंता वाढविणारी आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास ज्या शहरात रुग्णसंख्या वाढत आहे, त्याठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार का याविषयी चर्चा होत आहे. त्यावर टोपे म्हणाले, “नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन करावे लागेल. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल.”राज्यात आतापर्यंत 45 लाख जणांचे लसीकरण करण्यात आले. राज्यातील 2400 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालये भरली झाली असून, पूर्वीचा 80:20 चा फॉर्म्युला- खासगी रुग्णालयातील एकूण खाटांपैकी 80 टक्के खाटा या कोरोना रुग्णांसाठी राखीव- अंमलात आणणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करायची आहेत. ज्या ठिकाणी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांची गरज आहे तिथे जिल्हाधिकार्यांनी तातडीने भरती करायची आहे. जानेवारीत राज्यात दर दिवशी 2,000 रुग्ण आढळत होते. कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण नव्हते, त्यामुळे काही प्रमाणात वैद्यकीय कर्मचार्यांना कमी करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा गरजेप्रमाणे त्यांना सेवेत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.