कोरोना चा कहर आणि उन्हाचा तडाका ; पुणे – पिंपरी चिंचवड हैराण

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि. ३० मार्च । गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. पारा 37 अंशावर पोहचला आहे. यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्याने पुणे – पिंपरीचिंचवड कर हैराण झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने यांची धास्तीही पहायला मिळत आहे. रात्री आठ नंतर संचारबंदी लागू असल्याने शहरात शुकशुकाट पसरत आहे. तर दिवसभर कडक उन्हामुळे रस्ता ओस पडत आहे.

सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. तसेच भर दुपारी उन्हाचा चांगलाच चटका बसत आहे. पहाटे थंडी तर कधी अंगाची लाही लाही करणारा उन्हाचा तडाका अशा संमिश्र तापमानामुळे नागरिक चांगलेच घामाघुम झाले आहेत. बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शहर परिसरातील रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळत आहे. एकप्रकारे अघोषित संचारबंदी जाहीर केल्यासारखेच वातावरण दुपारी वर्दळीच्या रस्त्यावर पहावयास मिळत आहे . मे महिन्यातील कडक उन्हाप्रमाणे उन्हाची तिरीप लागत होती. एप्रिल व मे या दोन महिन्यात तर शहर व परिसरातील परिस्थिती आणखी भयावह ठरण्याची भिती निर्माण झाली आहे.

वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी नागरिकांनी आपला मोर्चा थंडावा देणाऱया पदार्थाकडे वळवला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील रस्त्यावर तसेच विविध दुकानात टोप्या, गॉगल्स, चष्मे, रूमाल, सनकोट, स्टोल, मास्क, हॅन्डग्लोज विक्रीसाठी आले आहेत. उन्हापासून संरक्षण करणाऱया कॉटन व वाळ्याच्या टोप्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसत आहे. बाजारात मातीचे डेरे, माठ, रांजण विक्रीसाठी आले आहेत. फ्रीज, पंखे, कुलर यांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दुकानात नागरिकांची गर्दी होत आहे. फळांच्या रसासोबत लस्सी, यासारख्या थंडपेयांना चांगली मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *