दुसऱ्या लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं महत्त्वाचं वक्तव्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३० मार्च – मुंबई – राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची चर्चा देखील सुरू झाली आहे. राज्यभरात लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या जमावबंदीमुळं त्यात भर पडली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह आनंद महिंद्रा यांच्यासारख्या मान्यवरांनीही लॉकडाऊनला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी भूमिका मांडली. ‘राज्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही परिस्थिती कशी हाताळावी हे आव्हान आमच्यापुढं आहे. अशा वेळी रुग्णवाढीचे प्रमाण आणि त्या तुलनेत आरोग्य सुविधा, औषधे या सगळ्याचं मोजमाप करणं आवश्यक असतं. रुग्णांच्या तुलनेत सुविधांचा अभ्यास करत राहावं लागतं. लॉकडाऊन हा कुणालाच मान्य होण्यासारखा नाही. तो कोणालाही आवडत नाही. पण परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. ‘तहान लागल्यावर विहीर खणायची’ अशी जी एक म्हण आहे. करोनाच्या बाबतीत तसं आपण करू शकत नाही. त्याची तयारी आधीच करावी लागणार आहे,’ असं टोपे म्हणाले.

‘मुख्यमंत्री स्वत: सर्व अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा करत आहेत. निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे? उद्योग, बांधकाम क्षेत्राला झळ कशी बसणार नाही हेही पाहावं लागणार आहे, असं ते म्हणाले. सुरुवातीच्या काळात कठोर निर्बंध लादून करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यावर सरकारचा भर आहे. त्यातूनही संसर्ग आटोक्यात न आल्यास लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल. अर्थात, त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि तज्ज्ञांच्या चर्चेतून घेतला जाईल, असं टोपे म्हणाले. लॉकडाऊनचा कालावधी किती असावा याबाबतही सर्वंकष चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *