महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ९ एप्रिल ।मुंबई हॅट्ट्रिक करणार का? बेंगलोरला पहिले विजेतेपद मिळणार का? सीएसके फॉर्ममध्ये परतणार का? की यंदा नवीनच विजेता मिळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजपासून सुरू होणार्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या पर्वात मिळणार आहे. आपल्या सहाव्या विजेतेपदाच्या प्रयत्नात असणारा गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असणार्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध शुक्रवारी सलामीला लढणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर उद्घाटनाचा सामना होणार आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लीगचे आयोजन जैव सुरक्षित वातावरणात होणार आहे आणि दर्शकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नसेल. पाच महिन्यांच्या आत दोन आयपीएल स्पर्धा आदर्शवत नसली तरीही चाहत्यांच्या दृष्टीने कोरोनाच्या दुसर्या लाटेत पुढील सात आठवडे रोमांचक असणार आहेत. भारतात गेल्या काही काळात कोरोना व्हायरसची प्रकरणे मोठ्या संख्येने वाढत आहेत. स्पर्धेवरदेखील कोरोनाचे सावट आहे. लीगला सुरुवात होण्यापूर्वी काही खेळाडू आणि सहयोगी स्टाफ पॉझिटिव्ह आले होते; पण खेळाडू जैव सुरक्षित वातावरणात असल्याने स्पर्धा व्यवस्थित पार पडेल याचा विश्वास बीसीसीआयला आहे.