महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि. ९ एप्रिल – एमपीएससी परीक्षेविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी सर्व स्तरांमधून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत ही बैठक बोलावली होती. या बैठकीमध्येच हा निर्णय झाला असल्याचे वृत्त आहे. तसेच या परीक्षा नंतर कधी घेतल्या जातील, त्याविषयी देखील निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल, असेही या बैठकीमध्ये ठरले असल्याची माहिती आहे.
दरम्यान यापूर्वी एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. यानंतर सरकारने परीक्षा लवकरात लवकर घेतल्या होत्या. मात्र यावेळी विद्यार्थ्यांची उलट भूमिका होती. परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली जात होती. यामुळेच कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.