महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ११ एप्रिल । गुंतवणूकदार आणि ग्राहकांना लाॅकडाउनची भीती सतावत आहे. करोना रुग्णवाढीने लाखाचा आकडा पार केला असून साथ आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. त्यातच दोन दिवसांवर गुढी पाडवा असून सराफा व्यावसायिक मिनी लाॅकडाउनने धास्तावले आहेत. सोन्याची मागणी कमी झाल्याने या मौल्यवान धातूच्या किंमतीत घसरण झाल्याचे दिसून आले.
तेजीत असलेल्या सोने आणि चांदीमध्ये शुक्रवारी नफावसुली दिसून आली आहे. त्या आधीच्या दोन सत्रात सोने ८०० रुपयांनी महागले होते. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव ४६६१० रुपयांवर स्थिरावला. त्यात २२८ रुपयांची घसरण झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४६३१४ रुपयांपर्यंत खाली आला होता.शुक्रवारी चांदीमध्ये देखील मोठी घसरण दिसून आली. एक किलो चांदीचा भाव ६७ हजारांखाली स्थिरावला. बाजार बंद होताना एक किलो चांदीचा भाव ६६९६१ रुपये झाला त्यात ५४० रुपयांची घट झाली. तत्पूर्वी चांदीचा भाव ६६३७१ रुपयांपर्यंत खाली घसरला होता.
आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी गेल्या २४ तासांतील करोनाची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार देशात करोनाचे १ लाख ५२ हजार ८७९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ८३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १६९२७५ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ९० हजार ५८४ जण करोनामुक्त झाले.
जागतिक बाजारात मात्र सोने दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव १७४८.८१ डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.४ टक्के घसरण झाली. चांदीचा भाव २५.२३ डॉलर प्रती औंस आहे. त्यात ०.८ टक्के घसरण झाली आहे. ब्राझीलसह इतर देशांत करोना झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता कमॉडिटी विश्लेषकांनी केली आहे. तर काहींच्या मते अमेरिका आणि चिनी अर्थव्यवस्था सावरत असल्याने गुंतवणूकदार सोन्यातून गुंतवणूक काढून घेत आहेत.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज रविवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४७१० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४५७१० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५६६० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९८१० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४३७५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७७१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५८६० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५६० रुपये आहे.