मॉर्गन-वॉर्नरच्या संघात आज मुकाबला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ११ एप्रिल । माजी चॅम्पियन्स कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आज (रविवार दि. 11) इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली सनराजयर्स हैदराबादविरुद्ध आपल्या आयपीएल मोहिमेला प्रारंभ करेल, त्यावेळी प्रामुख्याने हैदराबादच्या कामगिरीतील सातत्याच्या अभावाचा लाभ घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सायंकाळी 7.30 वाजता हंगामातील या तिसऱया साखळी सामन्याला प्रारंभ होणार आहे.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील मातब्बर कर्णधारांपैकी एक असलेल्या मॉर्गनकडे मागील हंगामातील निम्म्यात नेतृत्वाची सूत्रे सोपवली गेली होती आणि एरवी साधारण भासत आलेल्या या संघाने मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कात टाकल्याप्रमाणे खेळ साकारला होता. यंदा देखील या चमूकडून हीच अपेक्षा असणार आहे.

दिनेश कार्तिककडून मॉर्गनकडे नेतृत्वाची सूत्रे हलवली गेली, त्यानंतर संघ स्थिर होण्यात काहीसा वेळ खर्ची पडणे साहजिक होते. पुढे निर्णायक टप्प्यात सनरायजर्स हैदराबाद, आरसीबी व केकेआर यांचे समसमान गुण होते. मात्र, सरस धावसरासरीच्या निकषावर केकेआरला प्ले-ऑफपासून दूर रहावे लागले. गत हंगामात सलग दुसऱयांदा ते साखळी फेरीतच गारद झाले. यंदा ही कडी मोडीत काढण्याचा या संघाचा प्रयत्न असेल.

मॉर्गनकडून नेतृत्वात अपेक्षा

मॉर्गन पूर्णवेळ कर्णधारपद भूषवण्याची ही पहिली वेळ असेल. त्यामुळे, ज्याप्रमाणे गौतम गंभीरने विजयश्री खेचून आणण्याचा पराक्रम गाजवला, त्याची पुनरावृत्ती मॉर्गन करु शकणार का, याची येथे उत्सुकता असेल. मॉर्गनच्या नेतृत्वाखालीच इंग्लंडने 2019 आयसीसी वनडे विश्वचषकावर आपली मोहोर उमटवली होती, ते येथे उल्लेखनीय आहे.

या संघाकडे शुभमन गिलच्या रुपाने दमदार युवा फलंदाज असून राहुल त्रिपाठी, नितीश राणा आपली निवड सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्नशील असतील. दिनेश कार्तिक नेतृत्वाच्या दडपणापासून दूर झाला असल्याने तो देखील नैसर्गिक खेळ साकारण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करु शकेल. आंद्रे रसेलला मागील आयपीएल हंगामात 9 डावात केवळ 13 धावांची सरासरी नोंदवता आली आणि यात सामना जिंकून देणारी एकही खेळी तो साकारु शकला नव्हता. त्या अपयशाची भरपाई यंदा करण्यात रसेल यशस्वी होणार का, हे प्रत्यक्ष स्पर्धेतच स्पष्ट होऊ शकेल.

आणखी एक विंडीज खेळाडू सुनील नरेन देखील मागील हंगामात फ्लॉप झाला. 2012 व 2014 या हंगामात जेतेपदाचा साक्षीदार ठरलेल्या नरेनकडून येथे अपेक्षा ठेवल्या जातील की त्याऐवजी बांगलादेशी अष्टपैलू शकीब हसनवर लक्ष केंद्रित केले जाईल, हे आज पहिल्या सामन्यातील संघनिवडीत स्पष्ट होऊ शकते. एखादेवेळी दोन्ही खेळाडूंना निवडले गेले तर सामन्यातील कामगिरीवरुन पुढील रुपरेषा स्पष्ट होईल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्तम अधिराज्य गाजवत आलेल्या डेव्हिड वॉर्नरमुळे सनरायजर्स हैदराबादची आघाडी फळी मजबूत असेल. बहरातील जॉनी बेअरस्टो हा तडाखेबंद फलंदाज या संघात आहे. शिवाय, समवेत केन विल्यम्सन व मनीष पांडे असल्यामुळे पहिल्या चार खेळाडूंचा विचार करता या संघाला चिंतेचे अजिबात कारण नाही.

मागील हंगामात साहाने हैदराबादतर्फे सलामीवीराची भूमिका बजावली होती. राष्ट्रीय संघात रिषभ पंतच्या काही पराक्रमी खेळीमुळे साहा मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला. पण, आता स्वतःची उपयुक्तता नव्याने सिद्ध करुन दाखवण्याची संधी त्याच्याकडे येथे असेल. हैदराबादविरुद्ध आतापर्यंत झालेल्या आयपीएल लढतीत केकेआरने 12-7 फरकाने वर्चस्व गाजवले असून तोच कित्ता येथेही गिरवण्याचा या संघाचा प्रयत्न असू शकतो.

प्रतिस्पर्धी संघ

केकेआर ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टीम सेफर्ट, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शकीब अल हसन, शेल्डॉन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर, पवन नेगी.

सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यम्सन, विराट सिंग, मनीष पांडे, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, जॉनी बेअरस्टो, जेसॉन रॉय, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, केदार जाधव, जे. सुचित, जेसॉन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, रशीद खान, टी. नटराजन, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, बसिल थम्पी, शाहबाज नदीम, मुजीब उर रहमान.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *