आयपीएल २०२१ ; आज भारताचे दोन युवा आक्रमक फलंदाज आमने सामने

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१५ एप्रिल ।राजस्थान रॉयल्स संघासमोर उद्या (गुरुवारी) इंडियन प्रीमिअर लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे. दुखापतग्रस्त बेन स्टोक्स नसल्याने संघाला नवा कर्णधार संजू सॅमसनकडून आणखीन एका मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली चांगली सुरुवात करीत पहिल्या लढतीत माजी विजेत्या चेन्‍नई सुपर किंग्जवर सात विकेटस्ने विजय मिळवला. तर, राजस्थान रॉयल्सला चुरशीच्या लढतीत पंजाब किंग्जविरुद्ध अवघ्या चार धावांनी पराभूत व्हावे लागले. पंजाबने 222 धावांचा पाठलाग करताना रॉयल्सचा कर्णधार सॅमसन (63 चेंडूंत 119 धावा) याने शतक झळकावत सामना शेवटपर्यंत नेला; पण संघाला त्याला विजय मिळवून देता आला नाही.

राजस्थान संघाला मंगळवारी आणखीन एक झटका बसला तो म्हणजे अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स बोटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. स्टोक्सच्या अनुपस्थितीत जोस बटलर, शिवम दुबे आणि रियान परागसारख्या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. पहिल्या सामन्यात मनन वोहरा (12), बटलर (25), दुबे (23), पराग (25) यांना मोठी खेळी करता आली नाही. रॉयल्ससाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. पहिल्या सामन्यात संघातील गोलंदाज फॉर्मात दिसले नाहीत. पदार्पणातील लढतीत चेतन सकारियाने (31 धावांत तीन विकेटस्) चांगली गोलंदाजी केली. मुश्तफिजूर रहमान, ख्रिस मॉरिस, स्टोक्स, श्रेयस गोपाल आणि राहुल तेवातियाविरुद्ध फलंदाजी करताना पंजाबच्या फलंदाजांना अजिबात अडचणी आल्या नाहीत.

दुसरीकडे गेल्या सत्रातील उपविजेता असणार्‍या दिल्लीने या सत्रात चांगली सुरुवात करीत तीन वेळच्या विजेत्या चेन्‍नई सुपर किंग्जविरुद्ध सहज विजय मिळवला. सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 188 धावसंख्येपर्यंत मजल मारली. मात्र, दिल्लीकडून सलामी फलंदाज शिखर धवन (54 चेंडूंत 85 धावा) आणि पृथ्वी शॉ (38 चेंडूंत 72 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी रचली. गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास ख्रिस वोक्स (18 धावांवर दोन विकेटस्) आणि आवेश खान (23 धावांवर दोन विकेटस्) यांनी चांगली कामगिरी केली. यासोबत संघात रविचंद्रन अश्‍विन, टॉम करन, अमित मिश्रा आणि मार्कस स्टोईनिस यांच्याकडून देखील संघाला चांगल्या अपेक्षा असतील.

दोन्ही संघ यातून निवडणार

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयंक मार्कंडेय, अ‍ॅण्ड्र्यू टाय, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुश्तफिजुर रहमान, चेतन सकारिया, के. सी. करियप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंह.

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टोईनिस, ख्रिस वोक्स, आर. अश्‍विन, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कॅगिसो रबाडा, एन्‍रिच नॉर्त्जे, इशांत शर्मा, आवेश खान, स्टिव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमान मेरिवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करन, सॅम बिलिंग्ज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *