महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । अमित लगस । दि.२८ एप्रिल। मुंबई । १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पण लसींच्या कमतरेमुळे १ मे पासून हे मोफत लसीकरण सुरु करता येणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले. याचाच अर्थ १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडले आहे.
सरकारी दवाखान्यात लस मोफत मिळेल. पण खासगी दवाखान्यात तुम्हाला लस विकत घ्यावी लागेल. मोफत लसीकरणासाठी २ कोटी डोसेस विकत घ्यावे लागतील. त्यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च येईल. या खर्चाला राज्य शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
अगोदर नोंदणी करुनच केंद्रावर लस घेण्यासाठी जावे लागेल. थेट केंद्रावर येऊन लसीकरण होणार नाही. सबुरीने आणि समंजसपणाने काम करावे लागेल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी उपलब्ध होतील. कोव्हिशिल्डचे १ कोटी डोस प्रतिमहिना देऊ असे आम्हाला कंपनीने कळविले आहे. पण कोव्हॅक्सिन खूप कमी प्रमाणात मिळत आहे. त्यासाठी रशियाच्या स्फुटनिक लसीचा लसीकरणात अंतर्भाव करता येईल. झायडस कॅडिला आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसीदेखील उपलब्ध होतील, असे टोपे यांनी सांगितले.
राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.