महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । अमित लगस । दि.२९ एप्रिल। पुणे । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल संध्याकाळपासून राज्यात १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. तो १ मे रोजी सकाळी ७ वाजता संपणार असल्यामुळे आता पुढे काय? अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता खुलासा केला असून लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लॉकडाऊनच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली आहे. लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याची परिस्थिती सध्या राज्यात असून त्या अनुषंगाने सध्याच्या लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
३० एप्रिलपर्यंत सध्या आपण लॉकडाऊन लागू केला आहे. मंत्रिमंडळात त्यासंदर्भात देखील चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला लॉकडाऊन वाढवावाच लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात देखील मंत्रिमंडळाने चर्चा केली आहे. शेवटच्या दिवशी नक्की १५ दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाऊनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि ती किमान १५ दिवसांची होईल, असा माझा अंदाज असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.