ऑस्ट्रेलियाने विमान प्रवास बंद केल्याने झाम्पा, रिचर्डसनची अडचण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । निखिल गाडे । दि.२९ एप्रिल। मुंबई ।अॅडम झाम्पा आणि केन रिचर्डसन या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी कोरोनाच्या धसक्यामुळे आयपीएलमधून माघार घेतली. मात्र, ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानातील विमान प्रवास बंद केल्याने हे दोघेही खेळाडू मुंबईतच अडकून पडले आहेत.

अॅडम झाम्पा आणि केन रिचर्डसन यांनी ‘आयपीएल’मधून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हिंदुस्थानात कोरोनाने परिस्थिती बिघडल्याने ऑस्ट्रेलियाने 15 मेपर्यंत हिंदुस्थानातील विमानसेवा बंद केली आहे. त्यामुळे हे दोघेही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सध्या मुंबईत विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. ‘आयपीएल’च्या बायो-बबलमधून बाहेर पडल्याने ते आता मायदेशी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ऑस्ट्रेलियन सरकारशी बोलणे झाले आहे; परंतु अद्यापी तोडगा निघालेला नाही. या दोघांना मुंबईहून दोहा आणि मग तेथून ऑस्ट्रेलियाला पाठविण्याचे नियोजन होऊ शकते.

राजस्थान रॉयल्सचा ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅण्ड्रय़ू टेनेही आयपीएलमधून माघार घेत मायदेशी परतणे पसंत केले. त्यालाही दोहामार्गेच ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात आले. अॅडम झाम्पा आणि केन रिचर्डसन यांनी मायदेशी पाठविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र, तसे झाले नाही तर ‘एसीसी’ आणि ‘बीसीसीआय’ यांच्याशी चर्चा करून या दोघांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासंदर्भात मागणी केली जाणार आहे.

आपापल्या संघाकडून खेळण्याची संधी न मिळालेल्याच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी ‘आयपीएल’मधून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. इतर खेळाडू, प्रशिक्षक, सहयोगी स्टाफ आणि समालोचक हे मात्र आयपीएल सोडण्यास तयार नाहीत. हे सर्वजण स्पर्धा संपल्यानंतरच मायदेशी परतणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *