महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.३० एप्रिल । जनतेच्या आरोग्यरक्षणासाठीच राज्यातील लॉकडाउन 15 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात लागू करण्यात आलेले निर्बंध कठोरपणे पाळण्यात यावेत अशा सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
राज्यात आजच्या तारखेला 1715 मे. टन ऑक्सिजनची गरज आहे. तितका ऑक्सिजन पुरवठा होत असल्याचे सांगून राजेश टोपे म्हणाले, असे असले तरी ऑक्सिजनचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना सर्व रूग्णालयांना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची गळती वा इतर लॉस थांबविण्यासाठी ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. रेमडेसीवीरचा देखील सुयोग्य वापर करण्यास सांगण्यात आले आहे. पण अनावश्यक वापर निश्चित टाळला पाहिजे. ज्या छोटय़ा शहरांत मोठय़ा आरोग्यसुविधा नाहीत तिथे टेलिमेडिसीन सुविधा सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे असेही टोपे म्हणाले.