महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.३० एप्रिल । सिरमच्या कोविशिल्ड पाठोपाठ आता भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची किंमतही 200 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे राज्यांना प्रती डोस 600 रुपयांऐवजी 400 रुपये प्रती डोस या किमतीने कोवॅक्सिन मिळणार आहे. भारत बायोटेकने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात याविषयीची माहिती देण्यात आली आहे. राज्य आणि केंद्रासाठी लसींचे वेगवगळे दर का, असा प्रश्न विचारला जाऊ लागल्यानंतर आता हिंदुस्थानात लस बनविणाऱया दोन्ही कंपन्यांनी राज्यांसाठी आपल्या लसींचे दर कमी केले आहेत.
भारत बायोटेकने राज्यांसाठी लसची किंमत कमी करताना एक पत्रही जाहीर केले आहे. कोरोनाने देशात निर्माण झालेल्या बिकट स्थितीने चिंता वाढवली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. म्हणून आम्ही राज्यांसाठी कोवॅक्सिनची किंमत आता प्रती डोस 400 रुपये करत आहोत, असे भारत बायोटेकने पत्रात म्हटले आहे. पण खुल्या बाजारातील म्हणजे खासगी हॉस्पिटल्ससाठी भारत बायोटेकने आधी जाहीर केलेला दर कायम असणार आहे.