![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २६ जानेवारी | प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वाचा उत्सव; पण यंदा बाजाराने वेगळाच जल्लोष साजरा केला—सोन्या-चांदीचा! राजधानीत संचलन सुरू होण्याआधीच सराफा बाजारात दरांची परेड निघाली होती. सोनं इतकं महाग झालं की सामान्य माणसाने दागिन्यांकडे पाहिलं तरी खिशात काटा चावावा! जागतिक पातळीवर सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली, भू-राजकीय तणावांनी बाजार अस्वस्थ झाला आणि सोन्याने थेट आकाश गाठलं. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांनी जगाची झोप उडवली आणि त्याच वेळी सोन्याला सोन्याचे दिवस आले. डॉलर डळमळीत, शेअर्स घसरले आणि गुंतवणूकदारांनी एकमुखाने निर्णय घेतला—“चलो, सोन्याकडे!” परिणाम? आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ५,००० डॉलरच्या पुढे, चांदी १०० डॉलरच्या वर! , “जग जळत असताना सोनं तापतं, आणि चांदी चमकते!”
देशांतर्गत चित्रही वेगळं नाही. दिल्लीपासून मुंबईपर्यंत सोन्याने दरवाढीचा झेंडा फडकावला. एका आठवड्यात तब्बल १६ हजारांहून अधिक रुपयांची उडी—ही वाढ नाही, तर उडीच आहे! २०२५ मध्ये सोन्याने ६४ टक्के परतावा दिला आणि २०२६ सुरू होऊन अवघ्या २५ दिवसांतच १६ टक्क्यांची भर घातली. मध्यवर्ती बँकांची खरेदी, ईटीएफमधील गुंतवणूक आणि अमेरिकेचं सैल चलनधोरण—या सगळ्यांनी सोन्याला पंख लावले. चांदीनेही मागे राहण्याचं पाप केलं नाही. गेल्या वर्षी १४७ टक्के वाढ झाल्यानंतरही तिचा वेग कायम आहे. एका आठवड्यात ४० हजारांची वाढ आणि आज पुन्हा ५ हजारांची भर—म्हणजे चांदी आता ‘गरीबांची सोने’ राहिलेली नाही, तर श्रीमंतांची स्पर्धक झाली आहे. महाराष्ट्रात तर भाव ऐकूनच सामान्य खरेदीदाराने दुकानात पाऊल टाकण्याआधीच माघार घेतली!
पण इथे प्रश्न भावाचा नाही, तर मानसिकतेचा आहे. सोनं महाग झालं की आपण आनंद मानायचा की घाबरायचं? गुंतवणूकदारासाठी हा सुवर्णकाळ असू शकतो; पण लग्नसराई, सणवार आणि सामान्य माणसासाठी ही चिंता आहे. सोनं सुरक्षित गुंतवणूक असली, तरी ते प्रत्येक वेळी ‘सर्वोत्तम’च असेल, असा हट्ट धोकादायक ठरू शकतो. बाजार आज सोन्याच्या बाजूने आहे, उद्या वारा बदलू शकतो. इतिहास सांगतो—जिथे प्रचंड तेजी, तिथे संयमाची गरज! प्रजासत्ताक दिनी देशाने संविधानाची आठवण ठेवली; गुंतवणूकदारांनीही एक कलम लक्षात ठेवावं—लोभाला मर्यादा हव्यात. नाहीतर सोनं खिशात येईल, पण शांत झोप मात्र कायमची महाग होईल!
