![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २६ जानेवारी | मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी, पण इथे स्वप्न पाहणाऱ्यांना झोप येत नाही; कारण घराचे भाव स्वप्नातही परवडत नाहीत. अशा वेळी ‘म्हाडा’ हा शब्द उच्चारला की मध्यमवर्गाच्या डोळ्यात चमक येते. जणू काही सवलतीचा देवच अवतरतो! आता मार्चमध्ये तब्बल ३ हजार घरांची लॉटरी जाहीर होणार म्हटल्यावर मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. घर मिळण्याची शक्यता जितकी कमी, तितकी आशा मात्र प्रचंड! कारण मुंबईत “स्वस्त घर” ही संकल्पनाच विनोदी ठरावी, अशा काळात म्हाडा म्हणजे सरकारी आश्वासनांचा शेवटचा किल्ला. बाजारात जिथे बिल्डर ‘कार्पेट’ कमी आणि ‘आशा’ जास्त विकतो, तिथे म्हाडा निदान भिंती तरी देतो, हेच काय ते समाधान.
म्हाडाची लॉटरी म्हणजे लोकशाहीचा घरबांधणी प्रयोग! हजारो अर्ज, लाखो स्वप्नं आणि मोजकीच घरं. तरीही लोक अर्ज करतात, कारण मुंबईत “नाही” ऐकायची सवय झालीय; पण कधीतरी “लागल” अशी चिठ्ठी निघेल, या आशेवर संसार चालतो. बीडीडी चाळ, मोतीलाल नगर, पत्राचाळ, अभ्युदय नगर अशी नावं ऐकली की वाटतं—ही घरं नाहीत, तर मुंबईच्या इतिहासाची पुनरावृत्ती आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली आश्वासनं दिली जातात, आराखडे बदलतात, पण मध्यमवर्गाचं स्वप्न मात्र तसंच राहतं—स्वतःचं घर, तेही मुंबईत! म्हाडा म्हणते घरांच्या किमती कमी केल्या, पण मुंबईकर विचारतो, “कशाच्या तुलनेत?” कारण पगार वाढीपेक्षा घरांचे भाव नेहमीच पुढे असतात.
खरं तर म्हाडाची लॉटरी ही केवळ घरांची नाही, तर संयमाची परीक्षा आहे. फॉर्म भरण्यापासून ते निकाल लागेपर्यंत माणूस सरकारी प्रक्रियेचा पूर्ण अभ्यासक होतो. वेबसाईट चालू आहे का, सर्व्हर कोसळला का, अर्ज स्वीकारला गेला का—हे सगळे प्रश्न घरापेक्षा मोठे वाटू लागतात. तरीही म्हाडाकडे पाहून मुंबईकर अजूनही आशावादी आहे, हीच या शहराची खरी ताकद. कारण मुंबईत माणूस घराशिवाय राहू शकतो, पण आशेशिवाय नाही. मार्चमध्ये ड्रॉ निघेल, काहींच्या आयुष्याला चार भिंती मिळतील, उरलेले पुन्हा पुढच्या लॉटरीची वाट पाहतील. म्हाडा येते, जाते; पण मुंबईकराचं स्वप्न मात्र कायमच ‘अर्ज प्रक्रियेत’ असतं!
