![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २६ जानेवारी | सलग सुट्ट्या आल्या की कोकण रेल्वेला गर्दी होणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. तरीही दरवेळी रेल्वे प्रशासन अचंबित झाल्यासारखं वागतं—जणू गर्दी ही एखादी नैसर्गिक आपत्ती आहे! यंदाही तेच झालं. मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती, पण जादा गाड्या मात्र दिसल्या नाहीत. प्रवासी सुट्टीसाठी निघाले होते, पण रेल्वेने त्यांना संयमाची परीक्षा द्यायला लावली. कोकण रेल्वे म्हणजे कोकणवासीयांची जीवनवाहिनी; पण तीच वाहिनी सुट्टीच्या दिवशी इतकी जाम होते की श्वास घ्यायलाही ‘वेटिंग लिस्ट’ लागावी! नियोजनाचा गाडीच रुळावरच येत नाही, हीच खरी शोकांतिका.
कोकणकन्या एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमधली परिस्थिती पाहिली, तर ती प्रवास नव्हे, तर ‘मानसिक सहनशक्ती चाचणी’ होती. आरक्षित तिकीट असो वा नसो—सगळे एकाच डब्यात कोंबलेले! वृद्ध, महिला, लहान मुलं—सगळ्यांचे हाल झाले. गर्दीत घुसमट, उकाडा, अस्वस्थता आणि असहाय्य प्रवासी… हे दृश्य कोणत्याही ‘विकासाच्या’ जाहिरातीत शोभेल असं नाही. रेल्वेचे नियम कागदावर शिस्तबद्ध, पण प्रत्यक्षात ‘पहिले चढा, नंतर बघू’ असा कारभार! “रेल्वे ही लोकांची सेवा आहे की लोकांची परीक्षा?” कारण प्रवाशांनी तिकीट वेळेवर काढलं, सुट्टीचं नियोजन केलं, पण रेल्वेने मात्र नेहमीप्रमाणे ‘आम्हाला कल्पनाच नव्हती’ असा चेहरा केला. सलग सुट्ट्यांत गर्दी होणार हे माहिती असूनही जादा गाड्या न सोडणं म्हणजे नियोजन नव्हे, तर निव्वळ दुर्लक्ष!
खरा प्रश्न गर्दीचा नाही, तर मानसिकतेचा आहे. कोकण रेल्वे दरवर्षी त्याच चुका का करते? प्रवासी वाढतात, पर्यटन वाढतं, तरीही गाड्यांची संख्या तेवढीच का? कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी व्यक्त केलेली नाराजी ही एका व्यक्तीची नाही, तर हजारो प्रवाशांची आहे. रेल्वे प्रशासनाला ‘रिअॅक्ट’ न करता ‘प्लॅन’ करायला शिकावं लागेल. अन्यथा काय होईल? प्रवासी कोकणात जाण्याचा आनंद घेण्याआधीच रेल्वेत दमून जातील! सुट्टी म्हणजे विश्रांती असते; कोकण रेल्वेच्या प्रवासात मात्र ती शिक्षा बनते. गाड्या वाढवणं ही कृपा नाही, तर गरज आहे. नाहीतर पुढच्या सुट्टीत पुन्हा तेच चित्र—खचाखच डबे, मूक प्रवासी आणि रेल्वेचं नेहमीचं उत्तर: “गर्दी अपेक्षेपेक्षा जास्त होती!”
