पुढील दोन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.३ मे । राज्यातील काही भागांमध्ये आगामी दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांवर रक्षणासाठी ताडपत्री अथवा प्लॅस्टिकचं आवरण टाकावे, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. कालच पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले होते. तत्पूर्वी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही अवकाळी पाऊस झाला होता. (Weather alert Unseasonal rains and hailstorm expected in Maharashtra)

पिंपरी चिंचवडमधील परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला.

बारामती शहर आणि परिसरामध्ये आज सायंकाळी 4 वाजता वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. सुमारे अर्धा तास हा पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची मात्र अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली.

जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. रविवारी (2 मे) संध्याकाळी 6 वाजल्यापासून सोसाट्याचा वारा वाहत होता. अशातच जोरदार पावसाने हजेरी लावली. शेतामध्ये पाणी साचलेले आहे. उभ्या पिकांचे खूप नुकसान झाले. विजांचा कडकडाट चालू होता. शेतकरी बांधव मात्र आता काळजीत पडले आहेत.

सातारा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील अनेक भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. साडे चार वाजल्यापासून सातारा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. मागील 4 दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात पाऊस पडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *