महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. १९ मे । ‘तोक्ते’ वादळामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. कृषी क्षेत्राचे सुमारे अडीच हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. महावितरणला जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार 15 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाने अक्षरश: झोडपून काढले. जिल्ह्यात सर्वाधिक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. दहा घरांचे पूर्णत: सुमारे 59 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, 1863 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, हा आकडा जवळपासून 2 कोटी 40 लाखांहून अधिक आहे. मंडणगडमध्ये 200 तर दापोलीत 445 घरांचे नुकसान झाले असून, नुकसानीचा आकडा अद्याप पुढे आलेला नाही. याठिकाणी घरांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात घरांचे नुकसानच पाच कोटींच्या पुढे गेले आहे.
जिल्ह्यातील 48 शासकीय मालमत्तांचे नुकसान सुमारे 40 लाख रुपयांहून अधिक आहे. तर, 5 शाळांचे ऐंशी हजारांचे नुकसान झाले आहे. दुकान व पान, टपर्यांचे मिळून साडेतीन लाख नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 130 हून अधिक गोठ्यांचे एक लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. पाच पशुधनांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे शेतकर्यांचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात महसूल विभागाकडून पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवरील आंबा, काजू, नारळ, सुपारीचे नुकसान झाले आहे. हेक्टरी अठरा हजारप्रमाणे सुमारे साडेचार कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कृषी विभागाचे पंचनामे सुरु करण्यात आले असून आणखी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.