महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २६ मे ।काेराेनामुळे मृत्यू झाल्याच्या १२ ते २४ तासांनंतर विषाणू नाक, तोंडात (नेसल आणि ओरल कॅव्हिटी) सक्रिय राहत नाही. यामुळे मृतापासून संसर्गाचा जास्त धोका नसतो. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, ‘मृत्यूनंतर १२ ते २४ तासांच्या अवधीत सुमारे १०० मृतदेहांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मृत्यूच्या २४ तासांनी विषाणू नाक आणि ताेंडात सक्रिय राहत नाही.’ गेल्या वर्षभरात एम्सच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागात ‘कोविड-१९ पॉझिटिव्ह मेडिको-लीगल’ प्रकरणात अध्ययन केले होते. या प्रकरणांत पोस्टमॉर्टेमही केले. मृत शरीरातून तरल पदार्थ बाहेर येण्यापासून राेखण्यासाठी नाक, तोंड बंद करण्यास सांगितलेे आहे.