पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जून । नैर्ऋत्य मोसमी वारे सध्या द्रुतगतीने पुढे सरकत आहेत. ३ जूनला केरळमध्ये दाखल झाल्यानंतर एकाच दिवसात त्यांनी आंध्र प्रदेशला स्पर्श केला असून, उत्तरेकडे प्रगती करीत त्यांनी कर्नाटकातील कारवारपर्यंत मजल मारली आहे. वाऱ्यांचा सध्याचा हा वेग पाहता पुढील दोन-तीन दिवसांत म्हणजेच ६ किंवा ७ जूनला ते महाराष्ट्रात दाखल होतील, अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

अंदमानमध्ये २१ मे रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांना केरळपर्यंतचा प्रवास करण्यात काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सुरुवातीच्या टप्प्यात चांगली प्रगती सुरू असताना नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच ते केरळमध्ये पोहोचतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र, नंतर बाष्पाअभावी त्यांची प्रगती खुंटल्याने त्याचा केरळमधील प्रवेश लांबला. नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस उशिरा ३ जूनला ते केरळमध्ये दाखल झाले. या भागात पावसालाही सुरुवात झाली आहे.

४ जूनला त्यांनी दक्षिण अरबी समुद्रातून पुढे येत समुद्राच्या मध्य भागात प्रवेश केला आहे. केरळ आणि लक्षद्विपचा सर्व भाग त्यांनी व्यापला आहे. कर्नाटक किनारपट्टी आणि अंतर्गत भागातही त्याने प्रगती केली असून, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही त्यांनी प्रवेश केला आहे. मोसमी वारे आता कर्नाटकच्या कारवारपर्यंत आले आहेत.

मोसमी पाऊस आता महाराष्ट्राच्या जवळ आला असताना राज्याच्या अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाची हजेरी सुरूच आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ३ जूनलाही पाऊस होता. ४ जूनला पुणे, नाशिक, महाबळेश्वार, रत्नागिरी, औरंगाबाद, परभणी, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, गोंदिया, वर्धा आदी जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. मोसमी पाऊस सक्रिय होईपर्यंत पूर्वमोसमी पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *