बळीराजाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Spread the love

महाराष्ट्र २४; मुंबई – राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात झालेल्या अतिवृष्टीबाधित राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने बुधवारी रात्री या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यापूर्वीच आर्थिक मदत दिली असून, आता विदर्भात शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आर्थिक मदत सरकारने दिली आहे.

या वर्षी राज्यातील विविध भागात जुलै २०१९ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा नागरिकांना मोठा फटका बसला होता. त्या पार्श्वभूमीवर सांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बॅंका, खासगी बॅंका, ग्रामीण बॅंका व जिल्हा मध्यवर्ती बॅंकांमार्फत बाधित शेतकऱ्याने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ होणार आहे. यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जुलै ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांच्या मदतीबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची नियुक्ती करण्यात आली होती. समितीच्या निर्णयानुसार एक हेक्‍टर मर्यादेपर्यंतच्या पिकाच्या नुकसानीसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. पिकांना बॅंकेच्या निकषानुसार जे कर्ज दिले जाते, त्यानुसार हे कर्ज माफ करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही, त्यांना शासनाच्या नुकसानभरपाईच्या तीनपट रक्कम देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *