महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जुलै । कोरोनाचा संसर्ग हळूहळू आटोक्यात येत असला तरी तिसरी लाट केव्हा धडकेल हे सांगता येत नाही. सध्याची परिस्थिती पाहता वैद्यकीय तज्ञांनी तिसऱया लाटेची शक्यता वर्तवली असून तज्ञांच्या शिफारसी न्यायालयाला डावलून चालणार नाही. त्यामुळे लोकल प्रवासासाठी आणखी महिनाभर वाट बघा अशा सूचना मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज वकिलांना केल्या.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांप्रमानेच वकिलांनाही लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी या मागणीसाठी बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी बार कॉन्सिलच्या वतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे व अॅड. उदय वारुंजीकर यांनी बाजू मांडली. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, कोरोना काळात ऑनलाइन सुनावणी घेण्यात येत असल्या तरी काही न्यायालयात तातडीच्या प्रकरणांवर प्रत्यक्ष सुनावण्याही घेतल्या जातात. वकिलांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याने त्या ठिकाणी वेळेत पोहोचता येत नाही व इतर साधनांनी प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे वकिलांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. त्यावर मुख्य न्यायमूर्ती म्हणाले की, कोविड टास्क फोर्समधील तज्ञांनी तिसऱया लाटेचा धोका वर्तवला आहे. सर्वांसाठी लोकल सुरू केल्यास तिसऱया लाटेला आमंत्रण दिल्यासारखे होईल. त्यासाठी आणखी महिनाभर वाट पाहणे गरजेचे आहे. 31 जुलै ते ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत परिस्थिती सुधारण्याची शक्यता असून त्यावेळी लोकल प्रवासाचा निर्णय घेऊ.