पोलिस भरती : अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता डिसेंबरअखेर पोलिसांची 5,200 रिक्त पदे भरणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जुलै । ‘अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता 31 डिसेंबरपूर्वी राज्यातील पोलिसांची 5,200 रिक्त पदे भरण्यात येतील. तसेच आणखी सात हजार पदेदेखील लवकरच मार्गी लावण्यात येतील,’ असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी औरंगाबादेत दिले. औरंगाबाद शहर, ग्रामीण परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यासाठी वळसे पाटील यांच्यासह पोलिस महासंचालक संजय पांडेय सोमवारी शहरात आले होते.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत वळसे पाटील म्हणाले, ‘पोलिस दलात शिपाई पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना थेट उपनिरीक्षक पदावर बढती देण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच आतापर्यंत डिपार्टमेंटअंतर्गत उपनिरीक्षक पदासाठी वेगळी परीक्षा घेतली जात होती, त्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल. आगामी काळात काही बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे सूतोवाचदेखील त्यांनी केले. त्या अधिक पारदर्शीपणे करण्यात येतील,’ असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेते ईडीच्या रडारवर आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता वळसे पाटील म्हणाले, ‘ईडीला सध्या काही कामे नाहीत. आतापर्यंत केंद्र सरकारअंतर्गत काम करणाऱ्या ईडीच्या कारवाया होताना दिसत नव्हत्या. मात्र आता ज्या पद्धतीने वापर होत आहे तो चुकीचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *