महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला (Mumbai) झोडपून काढलं आहे. रात्रभर कोसळणाऱ्या धुव्वाधार सरींमुळे मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत, तर अनेक भागात पाणी साचलं आहे. आजही मुंबई, ठाणे, (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. पुढील पाच दिवस मुंबईत पावसाची स्थिती कायम राहणार असून मुंबईला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने थैमान घातलं आहे. शनिवारपासून तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक रस्त्ये तुडुंब भरुन वाहत आहेत. अनेकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. तर चेंबूर आणि विक्रोळीत दोन ठिकाणी इमारतीची भींत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अजून काहीजणं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज सकाळपासूनच मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये बहुतांशी ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील आणखी पाच दिवस मुंबईत हीच स्थिती कायम राहणार असल्याची माहिती मुंबई वेधशाळेचे प्रमुख जयंत सरकार यांनी दिली आहे.
18 Jul
Rainfall Summary of Mumbai Thane NM, Palghar. pic.twitter.com/mPTbwAntU9— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 18, 2021
मागील चोवीस तासांत कोलाबा याठिकाणी 196.8 मीमी, बांद्रा-206.5 मीमी, सांताक्रुझ 234.9 मीमी, मीरा रोड- 235 मीमी, दहिसर-268 मीमी, भायंदर – 203 मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर पुढील पाच ते सहा तासांत मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुंबई आणि आसपासच्या परिसरांत मुसळधार पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा इशारा कुलाबा वेधशाळेनं दिला आहे.
पुढील आणखी काही दिवस कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असून , जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मध्यरात्री पासुनच पावसाचा जोर वाढला आहे. आज कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे.