महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । मावळ तालुक्यातील कुसगाव खुर्द येथे पाण्याच्या खाणीत बुडून दोन मुलांसह वडिलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. पिराजी सुळे व त्यांची दोन मुले सचिन आणि साईनाथ अशी मृत्यू पावलेल्या बापलेकांची नावे आहेत.पिराजी दोन्ही मुलांना घेऊन कुसगाव खुर्द येथील धबधबे पहायला गेले असता, धबधब्याच्या पायथ्याशी उत्खनन केलेल्या खाणीत पाणी होते. या खाणीत दोन मुले बुडू लागल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पिराजी यांचाही बुडून मृत्यू झाला आहे.
एका शेतकऱ्याने त्यांना बुडताना पाहिले आणि आरडाओरड करून लोकांना गोळा केले. जमलेल्या नागरिकांनी त्यांना खाणीच्या दलदलीतून बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले आहे. या घटनेचा अधिक तपास कामशेत पोलीस करत आहे.