महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । करोनामुळे आयपीएल १४ स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित स्पर्धा कधी आणि कशी असेल, याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता होती. आता उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहे. तसेच अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे, असं बीबीसीआयनं जाहीर केलं आहे. ही स्पर्धा यूएईत पार पडणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघात होणार आहे. अनेक संघांमध्ये करोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर आयपीएलचे १४वे सत्र ४ मे रोजी तहकूब करण्यात आले. २ मे पर्यंत एकूण २९ सामने खेळले गेले. आयपीएल स्थगित होईपर्यंत दिल्ली कॅपिटल्सने आठ सामन्यांमधून सहा विजयांसह आघाडी घेतली. तर चेन्नई सुपर किंग्ज पाच विजयांसह दुसर्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचा कर्णधार असलेला आरसीबी पाच विजयांसह तिसर्या स्थानावर आहे.
आयपीएल २०२१ या स्पर्धेला ९ एप्रिलला सुरुवात झाली होती. या स्पर्धेतील अजून ३१ सामने उरले आहेत. मात्र करोनाचं संकट पाहता ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. मात्र एक एक करत करोनाची लागण खेळाडूंना होत गेली आणि बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयोजन करण्यापूर्वीच स्पर्धेवर करोनाची पडछाया होती. मात्र बायो बबलचं कारण देत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परदेशी खेळाडूंनी आयपीएल आयोजनावर प्रश्न उपस्थित करत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी ही स्पर्धा अर्ध्यात सोडली होती.
कोलकाता नाइटराइडर्सच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली. त्यामुळे कोलकाता आणि बंगळुरु दरम्यान होणार सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर कोलकाताच्या सामन्यानंतर दिल्लीचा संपूर्ण संघ क्वारंटाइन करण्यात आला होता. तर चेन्नईच्या तीन सदस्यांना करोनाची लागण झाली. त्यात गोलंदाज प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी याचाही समावेश होतो. संपूर्ण संघ त्याच्या संपर्कात होता. त्यामुळे स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयपीएलचे आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, १७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होईल. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. अबुधाबी, दुबई आणि शारजामध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जातील.