महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । महापुरामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पाण्याखाली जातो. हजारो वाहने अडकून पडतात. प्रचंड वित्तीय नुकसान होते. महापुरापासून सुटका होण्यासाठी या महामार्गावर पुराचे पाणी येणाऱ्या ठिकाणी पुलाच्या कमानी रस्त्याखाली बांधण्यात येतील. जेणेकरून पावसाचे पाणी न थांबता पुढे वाहते राहील. आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येतील. पुणे-बंगळूर व कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर हे उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तातडीने चर्चा केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पूरग्रस्तांना राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानीबाबत या भागातील मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. ‘पुराचे संकट ओढवलेल्या नागरिकांना उभे करण्याचे काम राज्य शासन करेल,’अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पवार म्हणाले, शिरोली व किणीजवळ पुराचे पाणी आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. दूध, इंधन, अन्नधान्याची वाहतूकही ठप्प झाली.
भविष्यात अशी परिस्थिती ओढवू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सन २००५, २०१९ व २०२१ मधील पुराच्या पाण्याच्या पातळीचा विचार करून महामार्गाची उंची वाढवण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करू. तर राज्य मार्ग व अंतर्गत मार्गांची कामे राज्य शासनासह वर्ल्ड बँक व अन्य बँकांच्या सहकार्यातून केली जातील, असे त्यांनी सांगितले.