महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । आजघडीला जालना जिल्ह्यात रुग्णवाढीचे प्रमाण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनापासून बचावासाठी कवचकुंडलाची भूमिका बजावणाऱ्या लसीकरणालाही जिल्ह्यात गती देण्यात येत आहे. लस ही अत्यंत सुरक्षित व फायदेशीर असून मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता जिल्ह्यातील प्रत्येकाने लस टोचून घेण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण देश कोरोना महामारीच्या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. जालना जिल्ह्यात आजघडीला कोरोनाची पहिली व दुसरी लाट ओसरल्याचे चित्र दिसत असून रुग्णवाढीचे प्रमाण कमी होण्याबरोबरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स, नर्स, प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्वसामान्य जनतेच्या योगदानामुळे हे शक्य झाले असून कोरोना काळात अडचणीत असलेल्या नागरिक तसेच रुग्णांना अनेकांनी निस्वार्थपणे मदत करुन माणुसकीचे दर्शन घडविले. जिल्ह्यात आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने पुरवण्यात आल्याने आपल्या जिल्ह्यासह ईतर जिल्ह्यातील रुग्णांनी जालना येथील कोव्हीड हॉस्पीटलमध्ये येऊन उपचार घेण्यास पसंती दर्शविल्याने शासकीय रुग्णालयाच्या सेवेबाबत एक विश्वासार्हता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.