महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन-आशिर्वाद यात्रा १९ आणि २० ऑगस्टपासून मुंबईतून सुरू होणार आहे. उद्या सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला माल्यार्पण करुन यात्रेला सुरुवात होईल. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जन-आशिर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.
यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाळासाहेब आंबेडकर स्मारक, शिवाजी पार्क येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, नरीमन पॉईंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत जन-आशिर्वाद यात्रेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, “जन-आशिर्वाद यात्रेमुळे मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी नक्कीच ताकद मिळेल. या यात्रेमुळे विकास व विश्वासाचं वातावरण निर्माण होईल. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे त्यांचा आशिर्वाद घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे.”