काळजी घ्या ; राज्यात डेंग्यूने डोकं वर काढलं; 11 जणांचा बळी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ऑगस्ट । पावसाळ्याच्या दिवसांत संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते. तर आता राज्यात चिकुनगुनिया तसंच डेंग्यूच्या आजारांनी डोकं वर काढल्याचं दिसून येतंय. या दोन्ही आजारांचा प्रादूर्भाव राज्यात दिसून येत असून डेंग्यूने 11 जणांचा बळी घेतला आहे. डेंग्यूचे सर्वाधिक सहा मृत्यू नागपूरमध्ये, तर भंडारा, वर्धा, चंद्रपूर, ठाणे आणि नगरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

डेंग्यू राज्यात सर्वाधिक रुग्णही नागपूर विभागात आणि नाशिकमध्ये आहेत. तर दुसरीकडे मुंबईत जुलैच्या तुलनेत आता डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. मुंबईत डेंग्यूचे 138 तर लेप्टोस्पायरोसिसचे 123 रुग्ण आढळले.

एडिस इजिप्ती जातीच्या डासाच्या माध्यमातून चिकुनगुनिया हा आजार पसरतो. या आजाराच्या रुग्णांची संख्याही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत वाढल्याचं चित्र आहे. चिकुनगुनियाचे 2019 मध्ये 298, 2020 मध्ये 782 इतके रूग्ण आढळले होते, परंतु यावर्षी ऑगस्टमध्येच रुग्णांची संख्या 928 झाली आहे.

राज्यात ठिकठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे लेप्टाच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये लेप्टोच्या रुग्णांची संख्या 184 वर आहे. यामध्ये लेप्टोमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

यासंदर्भात वृत्त वाहिनीशी बोलताना राज्याचे साथरोग विभाग प्रमुख डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, “डेंग्यू, चिकुनगुनिया, कॉलरा, गॅस्ट्रो यांसारखे आजार राज्यात काही प्रमाणात दिसू लागलेत. नाशिक तसंच सातारा या जिल्ह्यांमध्ये चिकुनगुनियाचे रूग्ण दिसून आलेत. पावसाळ्यात पूरस्थितीमध्ये दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचं प्रमाण वाढतं. सध्या पूरस्थिती असलेल्या भागांमध्येच हे प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलंय.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *