कोकणात जाताय! ‘मोदी एक्स्प्रेस’मधून मोफत प्रवासासह जेवण; असं करा बुकिंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । जेमतेम पंधरवड्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी दादर ते सावंतवाडीदरम्यान ‘मोदी एक्स्प्रेस’ची घोषणा आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. कोकणवासीयांना हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार असून, प्रवासादरम्यान एक वेळचे जेवणही मिळणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.

दर वर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने विशेष बस सोडण्यात येतात. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मानाचे स्थान देऊन कोकणाला प्राधान्य दिले आहे. यामुळे ‘मोदी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वे चालवण्यात येणार असून, १,८०० प्रवाशांना मोफत रेल्वेप्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे, असे नीतेश राणे यांनी सांगितले. दादर स्थानकातून सुटणारी ही गाडी कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडी येथे थांबणार आहे. या रेल्वेच्या आरक्षणासाठी २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान संबंधित मंडळ अध्यक्षांकडे फोनद्वारे संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

डब्यांच्या उपलब्धतेनुसार रेल्वे भाड्याने दिली जाते. यासाठी डब्यांच्या आसनांनुसार तिकीट आकारले जाते. यापूर्वी चित्रीकरणासाठी अशा पद्धतीने रेल्वेगाड्या भाड्याने देण्यात आल्या आहेत. त्या गाडीला तात्पुरत्या स्वरूपाचे नाव देण्याची मुभा संबंधितांना असते. राणे यांनी अशाच पद्धतीने रेल्वे आरक्षित केली असावी, असे रेल्वेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, ‘फ्लॅट टेरिफ रेटनुसार (एफटीआर) ट्रेन असण्याची शक्यता आहे. विहीत नियमांनुसार एफटीआरप्रमाणे रेल्वे आरक्षित करता येते,’ असे त्यांनी नमूद केले.

मध्य आणि पश्चिम रेल्वेने चालवलेल्या विशेष रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. एसटी महामंडळाने घोषित केलेल्या बसला देखील उदंड प्रतिसाद मिळत असल्याने कोकणवासीय आता खासगी बसकडे वळले असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *