महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ सप्टेंबर । अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसल्यास असे विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपात वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करून राखीव प्रवर्गातून प्रवेश घेऊ शकतात, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. मात्र या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करणे आवश्यक असून ऑनलाइन अर्ज करतेवेळी वडिलांच्या जात प्रमाणपत्रासोबतच सदर प्रस्तावाची पावती जोडणारे विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी आजपासून सुरू झाली असून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र नसल्याने राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशात अडचणी येत आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांच्या राखीव प्रवर्गातून प्रवेश घेता यावा यासाठी शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सूचना जारी केल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्या प्रस्तावाची पोच आणि वडिलांच्या जातीच्या दाखल्याआधारे त्यांना संबंधित प्रवर्गातून अकरावीत प्रवेश देण्याचे निर्देश प्राचार्यांना दिले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी वडिलांच्या दाखल्याच्या आधारे प्रवेश घेतला असेल त्यांना 30 दिवसांच्या आता स्वतःचे जात प्रमाणपत्र कॉलेजमध्ये जमा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी जात प्रमाणपत्र जमा करण्याची गरज असणार नाही.