राज ठाकरेंच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मनसे कडून पहिली प्रतिक्रिया

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ सप्टेंबर । मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधु राज ठाकरे (Raj thackeray) सातत्याने परप्रांतीयांची (outsiders) नोंद ठेवण्याची मागणी करत असतात. साकीनाका घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या मागणीची दखल घेत राज्याच्या गृहविभागाला (home dept) महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी, “इतका दूरदृष्टी असलेला नेता लाभला आहे, त्याचा सरकारने फायदा करुन घ्यावा” असे म्हटले आहे.

“कुठल्याही मतांचा विचार न करता, मतांवर डोळा न ठेवता महाराष्ट्राच्या भल्यासाठी व्हिजन मांडणार नेता म्हणजे राज ठाकरे” असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. “राज ठाकरे यांनी वारंवार सूचना केली आहे. कोण आपल्या राज्यात येत आहेत. कुठे राहतायत, त्याची माहिती सरकारला असली पाहिजे. त्यासाठी नोंदणी होणं आवश्यक आहे” असं संदीप देशपांडे म्हणाले.

“सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंतरराज्य स्थलांतर कायदा लागू आहे. जो कोणी परराज्यातून इथे कामाला येतो. त्याने तिथल्या लेबर कमिशनरकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. इथल्या लेबर कमिशनरकडे नोंदणी झाली पाहिजे. पण कायदा असून पण अमलबजावणी होत नाही” याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

“राज ठाकरे द्रष्टे नेते आहेत. ते कायम योग्य भूमिका मांडतात. उशिरा का होईना शहाणपण सुचलं, हे बरं झालं. भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त स्थलांतरितांबद्दलचा कायदा काय सांगतो तसं व्हावं” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *