Weather Forecast: राज्यात मान्सूनचा जोर वाढणार, या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० सप्टेंबर । देशाच्या काही भागात जोरदार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, दक्षिण राजस्थान, विदर्भ आणि तेलंगणा या भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, कोकण आणि गोवा, अंदमान आणि निकोबार बेटे, उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि ईशान्य भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

IMDने रविवारी सांगितलं की, पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या काही भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. तसेच बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल-बांगलादेश किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 4-5 दिवसांत गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज पूर्व राजस्थानात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये आणि 22-23 सप्टेंबर दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छच्या प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर 20 ते 23 सप्टेंबर दरम्यान उत्तराखंडमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, 19 आणि 20 सप्टेंबर रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

सोमवारपासून महाराष्ट्रातील विदर्भ आणि मुंबई परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भुते यांनी सांगितलं की, ‘सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण होतं आहे. ही स्थिती येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 20 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, “सर्वप्रथम, विदर्भात जोरदार पाऊस होईल. त्यानंतर हा पाऊस राज्याच्या उत्तरेकडील बहुतेक भागाला व्यापून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करेल. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रानंतर पालघर, ठाणे आणि मुंबई याठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *