दिल्ली हिंसाचार – आम आदमी पक्षाचा कोणी नेता दोषी पकडला गेल्यास दुप्पट शिक्षा करावी – केजरीवाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 -नवी दिल्ली :

देशाची राजधानी दिल्लीत गेल्या रविवारपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 3७ लोक बळी पडले असून जखमींची संख्या दीडशेच्या वर गेली आहे. हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी 106 संशयितांना अटक केली आहे. याशिवाय 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत केली जात असल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. आम आदमी पक्षाचा कोणी नेता दोषी पकडला गेला तर त्याला दुप्पट शिक्षा करावी, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

ईशान्य दिल्लीत रविवारी रात्रीपासून जातीय दंगलीला सुरुवात झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना म्हणजे सोमवारी व मंगळवारी हिंसाचाराची तीव्रता सर्वात जास्त होती. गेल्या दोन दिवसांत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे दंगलीवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या. काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.

हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही समाजाचे हिंसाचारात नुकसान झाले असल्याचे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल तर जखमी असलेल्यावर मोफत उपचार केले जातील, असे सांगून केजरीवाल पुढे म्हणाले की, मृत अल्पवयीन मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. किरकोळ जखमींना 25 हजार रुपये, नुकसानग्रस्त रिक्षासाठी 25 हजार रुपये, ई रिक्षासाठी 50 हजार रुपये दिले जाणार असून ज्यांचे घर वा दुकान जाळण्यात आले आहे, त्यांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. ज्या लोकांचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र जळाले आहे, त्यांना ही कागदपत्रे नव्याने काढता यावीत, यासाठी कॅम्प उघडले जातील.

दंगलग्रस्तापर्यंत मोफत भोजन पोहोचविले जाणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. हेल्पलाइन नंबर जारी केले जात आहेत, असे सांगतानाच केजरीवाल यांनी शांतता समित्या सक्रीय केल्या जाणार असल्याचे नमूद केले. आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसेन याच्याबाबत विचारले असता केजरीवाल म्हणाले की, दंगलीचे राजकारण होऊ नये, असे आपले मत आहे. माझ्याजवळ पोलिस नाही, मी कशी काय कारवाई करू शकतो? ताहिर हुसेन असो वा अन्य कोणी कडक कारवाई झाली पाहिजे. आम आदमी पक्षाचा कोणी नेता दोषी पकडला गेला तर त्याला दुप्पट शिक्षा करावी, अशी आपली भूमिका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *