Weather Update ; मध्य महाराष्ट्र – कोकणात मान्सूनचा धोका; पुण्यातही जोरदार पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ सप्टेंबर । गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी (Rain in maharashtra) लावली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला तर पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे औरंगाबादसह परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूरातील अनेक धरणं दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. यानंतर आता पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याने आज मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. येथील बहुतांशी जिल्ह्यांना IMD ने येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे.

उद्यापासून पुढील चार दिवस विदर्भात हळुहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे. आज पुण्यासह पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर, गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. आजही पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या मात्र पुण्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. पण त्यानंतर पुढील सलग तीन दिवस पुण्यात वेगवान वाऱ्याच्या साथीने विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मुंबईत आजपासून पुढील चार दिवस पावसाची शक्यता जवळपास नाही. पण काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *