राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र , राज्य सरकारला मोलाचा सल्ला !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० सप्टेंबर । कधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तर कधी उत्तर महाराष्ट्रात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. आता ‘गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे.

“महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे.”

“अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत रहातील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला शेतकऱ्याला ५०,००० रूपयांची मदत सरकारनं ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्ष शीघ्र कृतीची गरज आहे.”

“प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत रहातील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पहाण्याएवढी ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी मी ह्या पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे करत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *