धनगर आरक्षणासाठी शक्य ते सर्व करू, उद्धव ठाकरे यांची ग्वाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24-मुंबई
धनगर समाजासाठी करण्यात आलेली तरतूद कमी करणार नाही. धनगर आरक्षणाला कायदेशीर मान्यता मिळत नाही तोपर्यंत सर्व जबाबदारी सरकारची असून कुठेही काही कमी पडू दिले जाणार नाही. धनगर आरक्षणासाठी जे शक्य ते सर्व करू. यासंदर्भात एकत्रितपणे केंद्राकडे जाऊन न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.

धनगर आरक्षणासंदर्भातील तारांकित प्रश्नावर विधान परिषदेत विरोधकांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या गोंधळाला सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले गेल्याने सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा पाच मिनिटे आणि पुन्हा दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. या प्रश्नोत्तरादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित होते. धनगर आरक्षणाबाबत सदस्यांकडून विचारण्यात येणाऱया प्रश्नांना आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी मुद्देसूद उत्तरे देत असतानाही विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर सरकारची भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह धरला.

दहा मिनिटांच्या तहकुबीनंतर परत सभागृहाचे काम सुरू झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना धनगर समाज व अन्य समाजांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. एखादा विषय आपल्याला सोडवायचा की गोंधळ घालण्यात धन्यता मानायची हे एकदाचे ठरवा, असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात गोंधळ घालणाऱया सदस्यांना ठणकावले. गेल्या पाच वर्षांत धनगर समाजाचे अनेक नेते मला भेटले. हा विषय कोर्टात असून कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. धनगर समाज हा माझा आहे, सगळे समाज माझे, आपले सर्वांचे आहेत. आपल्याला विषय सोडवायचा असेल तर पक्षाची, जाती-समाजाची लेबलं बाजूला ठेवून यासाठी काम करायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *