महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ नोव्हेबर । २००७ चा विश्वविजेता भारतीय संघ आता उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम इंडिया विश्वचषक स्पर्धेतील आपला शेवट गोड करण्याच्या इराद्याने आज मैदानावर उतरणार आहे. तसेच विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ शेवटचा टी-२० सामना खेळणार आहे.
भारताचा गटातील पाचवा आणि शेवटचा सामना आज सोमवारी नामिबिया टीमशी होणार आहे. नामिबिया टीमची नजर आता विजयाने स्पर्धेचा निरोप घेण्याकडे लागली आहे. टीमने स्पर्धेत आपल्या गटात स्काॅटलंड संघाला पराभूत केले होते. मात्र, नामिबिया संघ त्यानंतर बलाढ्य अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात अपयशी ठरला होता.
त्यामुळे आता भारतीय संघाला विजयासाठी मोठी कसरत करावी लागण्याचे चित्र आहे. टीम इंडियाला गटातील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भारताने अफगाणिस्तान आणि स्काॅटलंडवर मोठ्या फरकाने मात केली. मात्र, आता न्यूझीलंडविरुद्ध अफगाणिस्तान टीमच्या पराभवाने भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील प्रवेशाचे स्वप्न भंगले आहे.
आता शेवटच्या सामन्यात राेहित शर्मासह लाेकेश राहुल, विराट काेहली, रवींद्र जडेजा आणि शमी उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच गाेलंदाजीत शमी आणि अश्विनही लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या शमी आणि बुमराह हे चांगलेच फाॅर्मात आहेत. त्यामुळे टीमला याचा निश्चितपणे माेठा फायदा हाेऊ शकेल.