महाराष्ट्र 24-मुंबई –
एखाद्या तरुणीबरोबर सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी खोटी आश्वासने देऊन तिची फसवणूक केली तर त्या तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो. असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. एका प्रकरणात आरोपी आणि तक्रारदार तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, आरोपीचे अन्य मुलीवरही प्रेम आहे, असे तक्रारदार तरुणीला समजल्यानंतर तिने अकोला येथे आरोपीच्या विरोधात बलात्कार आणि फसवणुकीची फिर्याद नोंदविली. ही तक्रार रद्द करण्यासाठी आरोपीने स्थानिक सत्र न्यायालयात दावा दाखल केला. मात्र, हा दावा अमान्य झाल्यामुळे त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका दाखल केली.
तक्रारदार तरुणीबरोबर माझे प्रेमसंबंध होते आणि तिने स्वतःहूनच शारीरिक संबंधांना तयारी दर्शविली. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा लागू होऊ शकत नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला. मात्र, आपली दिशाभूल करण्यात आली. वास्तव समोर आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. चुकीच्या पद्धतीने आपली सहमती घेतली, असा दावा तरुणीच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला.