Omicron Variant : महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंध अथवा लॉकडाउन लागणार का ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .9 डिसेंबर । करोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग वाढण्याची भीती आणि महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध (Maharashtra Lockdown) लावण्याबाबत नागरिकांमध्ये असलेली चिंता या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गाची तीव्रता अत्यंत कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे सांगतानाच, महाराष्ट्रात कठोर निर्बंध लावण्याबाबत कोणताही विचार सध्या तरी नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

ओमिक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल, बुधवारी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंध अथवा लॉकडाउन लागणार का, याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता, त्यांनी लॉकडाउनबाबतचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. ‘थ्री टी’ फॉर्म्युला म्हणजेच, टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्र्रीटमेंट यावर अधिक भर देण्यात येत आहे. कोविडसंबंधी नियमांची अंमलबजावणी यावर अधिक भर देण्यात येत असल्याचे टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आतापर्यंत ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा संसर्ग झालेले १० रुग्ण आढळले आहेत. ६५ नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर स्क्रीनिंग वाढवण्यात आली आहे. ओमिक्रॉनचा फैलाव जवळपास जगभरातील ५४ देशांमध्ये झालेला दिसून येत आहे. विषाणूची संसर्गक्षमता अधिक आहे. मात्र, त्याची तीव्रता अत्यंत कमी आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याचे कारण नाही, असे टोपे यांनी सांगितले.

टोपे म्हणाले की, ‘राज्यात कठोर निर्बंध अथवा लॉकडाउन लावण्यासंदर्भात कोणताही विचार नाही. राज्याच्या टास्क फोर्सकडून अद्याप तशा काही सूचनाही आलेल्या नाहीत. आम्ही परिस्थितीवर अत्यंत बारीक नजर ठेवून आहोत. केंद्र सरकार, टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या सूचनांनंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल.’ ओमिक्रॉनचा प्रादूर्भाव रोखण्यासंदर्भात विचारणा केली असता, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, आम्ही ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंग यावर भर दिला जात आहे. जीनोम सिक्वेन्सिंगबाबत सांगायचं झाले तर, सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे तीन प्रयोगशाळा आहेत. नागपूर आणि औरंगाबादमध्येही ही सुविधा सुरू करण्याचा विचार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *