महाराष्ट्र २४- : मुंबई ; भारतानं सुरुवातीपासूनच करोनाग्रस्त रुग्णांना इतरांपासून वेगळं ठेवण्यासाठी ‘आयसोलेशन कॅम्प’ची व्यवस्था केली होती. परदेशातून मायदेशात आणलेल्या आणि करोना संक्रमित लोकांना त्यांच्या जवळच्यांपासून वेगळं ठेवण्यासाठी त्यांना आयसोलेशन कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं. त्यामुळे या संशयितांच्या आणि रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत करोना व्हायरस पोहचू शकला नाही. आत्तापर्यंत कोणत्याही करोना प्रभावित व्यक्तीनं सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांवर टीका केलेली नाही.
१३५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अटोकाट मेहनत घेत असल्याचंच यातून दिसतंय. इटलीसारखा छोटा आणि विकसित देशही करोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सपशेल फेल ठरतोय. त्याचं कारण म्हणजे इटलीसारख्या देशात वयस्कर व्यक्तींची संख्या अधिक आहे. प्रतिकारशक्ती कमी असल्यानं करोना विषाणूचा परिणाम त्यामुळेच इथं अधिक दिसून येत आहे.
विरोधकांकडूनही कौतुक ; उल्लेखनीय म्हणजे, करोनाची भीती पसरण्याआधीच सरकारनं या विषाणूबद्दल जनजागृती पसरवण्याचं काम केलं आणि योग्य ती पावले उचलली. चीनमध्ये तर ज्या डॉक्टरनं करोना विषाणूबद्दल सतर्क केलं होतं त्यालाच दंडित करण्यात आलं. परंतु, भारतात मात्र सगळ्या सरकारी यंत्रणा वेळीच अलर्ट झाल्या. त्यामुळेच काँग्रेस नेत्यांनाही मोदी सरकारचं कौतुक करावं लागलंय. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी मोदी सरकारच्या प्रयत्नांबद्दल संतुष्टी व्यक्त केलीय.