महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ डिसेंबर । विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अति महत्त्वाच्या विषयावर भाष्य केले आहे. जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या तसेच राज्यात देखील वेगात पसरणाऱ्या कोरोनाचा नव्या विषाणू ओमायक्रॉनबद्दल अजित पवार यांनी आमदारांचे चांगलेच कान टोचले आहे. तसेच लॉकडाऊन संदर्भात देखील पवारांनी भाष्य केले आहे.
अजित पवार म्हणाले की, अध्यक्ष महोदय मी या सभागृहातील सर्वांना सांगू इच्छितो की, आपले हिवाळी अधिवेशन कालपासून सुरू आहे. इथे बसलेले लोक प्रतिनिधी तीन-चार लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत असते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कोरोना संदर्भात गांभीर्याने विचार करत आहेत. त्यामध्ये देशात रात्री लॉकडाऊन लावण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. मात्र इथे (सभागृहात) काही ठराविक जण सोडले तर कोणीही मास्क लावत नाही.
संपुर्ण महाराष्ट्र इथे काय चालले आहे, ते बघत आहे. जर आम्हीच कोणी मास्क लावले नसेल तर कसे होईल. मी मास्क लावून बोलतो, जर बोलताना कुणाला मास्क काढून बोलायचे असेल तर बोला मात्र आपले म्हणणे संपल्यानंतर पुन्हा तोंडाला मास्क लावा. असे म्हणत अजित पवारांनी आमदाराचे कान टोचले आहे.
अजित पवारांच्या मास्कच्या वक्तव्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सर्वांना मास्क लावायला सांगितले. बोलताना मास्क काढले तरी चालेल मात्र, त्यानंतर मास्क लावून घ्या. अशी विनंती विधानसभा अध्यक्षांनी सर्वांना केली आहे.