महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ डिसेंबर । निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. शनिवारी (दि. २५) निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर पारा ६.५ अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे.
निफाड तालुक्यात गत पंधरवाड्यात अवकाळी पावसानंतर हवामान बदलत होते. तपमानात घट होऊन थंडीत वाढ झाली. चालू द्राक्ष हंगामात ६.५ अंशावर पारा आल्याने द्राक्ष या मुख्य पिकाला या थंडीचा फटका बसणार आहे. सध्या द्राक्षमणी विकसित होऊन त्यांची फुगवण होण्याचा काळ आहे. मात्र थंडीत वाढ झाल्याने द्राक्षमण्यांची फुगवण थांबली आहे.
द्राक्षबागा कडाक्याच्या थंडीत सुप्तावस्थेत जातात. त्यांची मुळे व पेशींचे कार्य मंदावते. त्याचा परिणाम द्राक्ष घडांचा विकास थांबतो व द्राक्षमालाच्या प्रतवारीस अडथळा निर्माण होत आहे. यावर द्राक्षबागेत शेकोटी करणे तसेच पहाटेच्या वेळी ठिबक सिंचन अथवा संपुर्ण बागेला पाणी देणे अशी उपाययोजना करावी लागत आहे. बहुतांश भागात पहाटे पाणी देण्यासाठी वीज भारनियमनाचा अडथळा ठरतोय. त्यामुळे द्राक्ष बागायतदार कोंडीत सापडला आहे.
तापमान घसरत चालले असल्याने परिपक्व द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका द्राक्ष बागायतदारांच्या मानगुटीवर आहे. चालुू द्राक्ष हंगामात द्राक्ष बागायतदारांना नैसर्गिक संकटांनी हैराण केले आहे. दुसरीकडे तपमानातील घसरण कांदा, गहु, हरभरा या रब्बी पिकाला पोषक आहे.